-20%

Shree Gajanan Maharaj Vijay Granth Sahityik Parayan श्री गजानन विजय ग्रंथाचे साहित्यिक पारायण

Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.

आदरणीय सौ वैशाली ताईंच्या मनोगतातून पारायण व वाचन ह्यातील फरक स्पष्ट होतो. वाचनांत मनन असेलच असे नसते – उदा. आपण रोज पेपर वाचतो व बाजूला ठेवल्यावर क्षणांत विसरुन जातो. परंतु पारायणांत खूप कांही सामावलेले आहे – उदा. श्रध्दा, भक्ति, भाव, चिंतन, मनन, मार्गदर्शन, प्रेरणा, आश्वासन, आपल्या पाठीशी वैश्विक शक्ती उभी आहे ह्या भावनेतून पोरकेपण निघून जाणे त्यातून आत्मविश्वास उभा राहून जीवनांचे ध्येय, उद्दिष्ट गवसणे व नैतिकतेच्या पायावर जीवन विकास साधून नर अपनी करनी करे तो नर का नारायण हो जाए। ईश्वराप्रत जाण्याचा प्रवास प्रगतीपथावर नेणे अशा अनेकविध बाबी पारायणांतून लाभतांत. साहित्याच्या क्षेत्रातील नामवंत पण एकेकाळी नास्तिक असलेल्या व्यक्तिद्वारे तरुण पिढीला बुआबाजी व संत-संतकार्य ह्या विषयीचा संभ्रम दूर होऊन योग्य मार्गदर्शन मिळावे अशा ईश्वरी प्रेरणेतूनच सौ. ताईंच्या हातून हे बुध्दिनिष्ठ चिंतनपर विचार पुष्पांची माळ श्री सद्गुरुंचे – श्री गजानन महाराजांचे पायी अर्पण होत आहे असा विश्वास सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल ह्यांत शंका नाही.
सौ. वैशाली ताईंनी अत्यंत सुलभ व सोप्या भाषेत प्रत्येक अध्यायातील महारांजांची कृती, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर महाराजांचा प्रभाव, चालीरीती, रूढींविषयी महाराजांची बुध्दिनिष्ठ शिकवण ह्यांचा सूक्ष्म विचार करुन विवेचन केलेले आहे.
वेद, उपनिषदे, पुराणे, महाकाव्य, सुभाषिते,श्लोक, अवतार व संतांची चरित्रे इत्यादीं वाचण्याची मधील शब्दार्थ व गूढार्थ हा फरक लक्षांत घेणे, त्याविषयी औत्सुक्य निर्माण होणे व संतकृपेने त्याची उकल होऊन मतिप्रकाश होणे ह्या साठी पारायण-चिंतन-मनन-जप-ध्यान-अनुकरण करण्याची बुध्दि-प्रवृत्ती होणे ह्याला ईश्वरी कृपा म्हणता येईल. पापक्षये रघुनाथ सेवा- ही उक्ती समजणे गरजेचे आहे. सौ. वैशाली ताईंनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने सुलभ शब्दांत व प्रभावीपणे आपल्या लेखनाद्वारे पोहोचविण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.
आदरणीय सौ. वैशालीताई पंडित व सह्रृद श्री बिपिन जी बाकळे यांचे स्नेहकृपेने मला हे अध्ययन व विवेचन करण्याच्या रुपाने श्री महाराजांचे स्तवन, स्मरण करण्याचे भाग्य लाभले. त्यांचा मी सदैव ऋणी आहे. ही सुध्दा महाराजांची कृपा. जे जे आपणांस योग्य वाटेल, रुचेल ते ते महारांजांचे देणे व त्यांची प्रेरणा व ज्या ज्या चुका किंवा चुकीचे अर्थ मी केले असतील ते ते माझे अज्ञान असून आपण मला अजाण बालक समजून उदार अंतःकरणाने क्षमा करावी ही विनम्र प्रार्थना.
जय जय गण गणांत बोते — संत सद्गुरु श्री गजानन महाराजकी जय.

प्रा. डॉ. ॐप्रकाश ग. कुलकर्णी

Description

केवळ पोथी की पथदीप  ग्रंथ 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मी गेली पन्नास वर्षे ‘गजानन विजयग्रंथ’ वाचत आले आहे. लहानपणी त्यातल्या एकवीस ओव्या रोज वाचल्याखेरीज जेवण मिळणार नाही, असा नियम असल्याने तो ग्रंथ सक्तीने वाचला गेला.
बालपणात चमत्कारांचे आकर्षण अधिक असल्याने त्यातले काही अध्याय गोष्ट म्हणून लक्षातही राहिले होते. पण त्या वाचनात उरकून घेण्याची वृत्ती होती. जसजसे वय वाढले तशी चिकित्साही वाढीस लागली. म्हणून ग्रंथ वाचताना मध्येच थबकले जाई. का? कसे? यात मन अडकू लागले.
पण एवढे मात्र खरे की रोजच्या ओवी वाचनाची आता सवय लागली. त्या वाचल्याशिवाय चैन पडेना.
वयाची चाळिशी पार करताना संसारातले चढउतार पाहून झाले. रोजचा संसार नावाचा गाडा हाकताना मनाला कुठलेतरी इंधन आवश्यक वाटू लागले. खंबीर होण्यासाठी मनोबळ हवे झाले; तेव्हा दैनंदिनीत एकवीस ओव्यांऐवजी आता संपूर्ण अध्यायाचा समावेश झाला. आणि एका क्षणी…. वीज चमकावी तसा विचार मस्तकात लख्ख चमकला ! इतकी वर्षे आपण हा ’गजानन विजय ग्रंथ’ वाचतो आहोत. अगदी रोज ..रोज…एकविसावा अध्याय झाला की परत पहिल्या अध्यायाला सुरूवात करतो आहोत… तरीही हा ग्रंथ पहिल्यांदाच वाचावा इतका ताजा, इतका रसरशीत वाटतो आहे. तो आजवर कधीच शिळा झालेला नाही.
इतर वेळी, कितीही आवडलेले पुस्तक फार फार तर दोनतीनदा वाचले की पुरे होते. पुन्हा वाचायची तितकी उत्सुकता उरत नाही. मग या ग्रंथात असे काय आहे की सदैव टवटवीतच वाटावा? आता मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची असोशीच निर्माण झाली.ती अशासाठी की, आत्ताची नवी पिढी वडिलधार्‍यांनी सांगितले म्हणून डोळे झाकून ऐकणारी मुळीच नाही. शिक्षणाने, ज्ञानाच्या प्रभावाने ती बुद्धिनिष्ठ झालेली आहे. पोथीवाचन करण्यापेक्षा व्यवहारी दृष्टीकोन बाळगणारी झालेली आहे. मग हा विजय ग्रंथ त्यांच्यापर्यंत कसा पोचावा? या ग्रंथाची आपल्याला जाणवलेली तर्कशुद्ध वैशिष्ट्ये, गजानन महाराजांच्या चरित्रातील समाजभान, जीवनजाण त्यांच्यापर्यंत नेली तर ? आणि म्हणून या ग्रंथाचा रसास्वाद प्रवास सुरू झाला. त्या प्रवासात पहिला मुद्दा प्रकर्षाने जाणवला की, ‘होय, या ग्रंथाची रचना ’संत साहित्यिक दासगणू’ यांनी केली आहे’. एखादी साहित्यिक जाण असलेली व्यक्ती साहित्य निर्मिती करता करता समकालीन संतांची चरित्रे लिहिते आणि स्वतःच संत या उपाधीपर्यंत पोचते हा प्रवास माझ्या कुतूहलाचा विषय झाला. मग ‘संत साहित्यिक दासगणू’ यांच्याबद्दल माहिती घ्यायला सुरूवात झाली. या शोधयात्रेत भेटलेले दासगणू मुळचे कोण? ते कवी कसे झाले? कोणत्या ओढीने त्यांनी गजानन चरित्र लिहिले? त्यांचा गजानन विजयग्रंथ हा असंख्य भक्तगणांच्या देवघरातील पूजनीय पोथी आहे. ‘पोथी’ या विशेषणातून मला या ग्रंथाला बाजूला करावेसे वाटले. हा मराठी भाषेतला अनमोल खजिना केवळ देवघरात न राहता, तरूण नागरिकांपर्यंत जावा, त्यांनी अध्यात्म या शब्दाला बिचकू नये आणि भारतीय योगशास्त्राबद्दल सजग रहावे. सक्रिय असावे. आरोग्याची गुरूकिल्ली शोधावी असे मला मनापासून वाटले म्हणूनच हे गजानन विजय ग्रंथाचे ‘साहित्यिक पारायण’. यात दासगणूंची शैली, तत्कालीन सामाजिक, कौटुंबिक आणि अध्यात्मिक मानसिकता यांचा धांडोळा घ्यावासा वाटला.
एक अजून अनुभवले. लेखनाच्या संदर्भासाठी, या ग्रंथातील एकवीसही अध्याय माझे रोजच्या रोज वाचून होत होते. माझ्या बाबांनी कदाचित् या निमित्ताने माझ्याकडून राहून गेलेली पारायणे करवून घेतली असावीत.
हे लेखन फार जोखमीचे होते. महाराजांचा भक्तगण अनंत आहे, सुजाण आहे. एकही अक्षर इकडे तिकडे झालेले खपवून घेतले गेले नसते, याची मला जाणीव होती. मनातल्या जिज्ञासेला सोबत घेऊन मी हा शोधप्रवास केला. अर्थात या प्रवासासाठी माझे आगाऊ आरक्षण महाराजांनीच केलेले होते. प्रवासात मला इत्तुसाही त्रास होऊ दिला नाही. या प्रवासात मी निर्मळ आनंद घेतला. हा आनंद हाच महाराजांनी मला दिलेला प्रसाद आहे.
श्री गजानन विजयग्रंथावर कृतज्ञतेची दुर्वा फुले वाहून माझ्या पुढच्या पिढीच्या हातात हा ग्रंथ डोळसपणे जावा ही प्रार्थना माझ्या शेगावीच्या बाबांकडे करते आणि इथेच थांबते !

Additional information

Weight140 kg
Dimensions215 × 140 × 5 cm