Chitra Soundarya Bodh aani Vichar – चित्र सौंदर्य – बोध आणि विचार

600.00

अध्यापनाच्या कामाचा मी ३० वर्षे अनुभव घेतला. विद्यार्थिनींना शिकवत असताना त्यांना
पडलेल्या प्रश्नांवर विचार करत उत्तरे शोधत गेले. मनात आलेल्या विचारांना लिखित स्वरूप देण्याच्या
उद्देशाने लिखाण करत गेले. चित्रकलेच्या शिक्षणाच्या दृष्टीने जे अनेक विषय येतात त्यांच्या अनुषंगाने
आलेले विचार मांडत गेले. आपल्या मनाचा ठाव घेणाऱ्या अनेक गोष्टी, ज्यांना आपण सहजच सुंदर
म्हणतो,ते का ? चित्र मांडणीची काय खुबी असते ? अशा अनेक गोष्टी. आधी अनोळखी…पण
कालांतराने बघताना, अनुभवताना ओळखीचे होत जाणारे अनेक आकार, रंग, विविध छटा त्यांचे
संदर्भ…या साऱ्या विचारांना शब्दांकित करताना मला खूपच आनंद, समाधान मिळाले.

Description

चित्र असो, शिल्प असो वा एखादं गाणं असो, कलाकृतीच्या निर्मितीत असलेली अभिजातता जेव्हा लक्षात येते तेव्हा त्या कलाकृतीच्या सौंदर्य निर्मितीत असलेली कलाकाराची प्रतिभा, त्याची अथक साधना, उच्च दर्जाची कलात्मकता, अभिजातता यांचा परिचय होतो. या अभिजाततेचा परिचय करून घेण्याचा ध्यास एखाद्याने घेतला की त्याची पावले हळूहळू कला साधनेकडे वळू लागतात.
चित्रकलेचे शिक्षण घेत असताना असे हे ‘नेमके सौंदर्य’ चित्रातून उतरविण्याचे तंत्र आत्मसात करणे खूपच गरजेचे असते. चित्रकलेचे शिक्षण घेत असताना त्यात असलेले अनेक टप्पे काळजीपूर्वक अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. चित्रकाराचा खरा परिचय त्याच्या कलाकृतीतून होत असतो. म्हणून प्रत्येक कलाकृती ही पूर्ण अभ्यासांती व नावीन्यपूर्ण घडविण्याकडे विद्यार्थ्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कलाकृतीसाठी सूक्ष्म निरीक्षण, चिंतन आणि कृती या त्रिसूत्रीवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. चित्रकलेचे मूळ घटक व मूळ तत्त्वे यांचा अभ्यास करत असतानाच आधीच्या व आजच्या चित्रकारांनी त्यांच्या चित्रातून त्याचा कसा विचार केला आहे हे समजले, तर ते आकलन स्वतःच्या चित्र निर्मितीसाठी खूपच प्रेरणादायी होऊ शकते.
कलाशिक्षण घेत असताना चित्ररचनेच्या अभ्यासाबरोबर अनेक विचारवंतांनी कलेच्या संदभनि विचार मांडले आहेत, ते कलाशिक्षणात अंतर्भूत असलेल्या ‘सौंदर्यशास्त्र’ या विषयात येतात. त्यांचा ऊहापोह करणे गरजेचे असते. पाश्चिमात्य सौंदर्य-विचार आणि भारतीय सौंदर्य-विचार हे जरी दोन प्रवाह दिसत असले, तरी त्या दोन्हीमध्ये असलेले साम्य आणि भेद लक्षात घेतले तर चित्र-रचनेची उकल सहज होईल. त्याच बरोबर अजून एक गोष्ट लक्षात येते की चित्र प्रदर्शनास आलेले अनेक जण म्हणतात, “आम्हाला चित्रकलेतील काहीच कळत नाही.” असे म्हणत एका चित्राकडून पुढील चित्राकडे जात असतात. चित्र समजून घेणे त्यांना जमत नाही. कारण ते त्या चित्राशी संवादच साधत नाहीत. चित्रकाराने काय मांडले आहे हे समजून घेतले तरच त्यातील भाव बघणाऱ्याला समजतील. संगीताचा आनंद घेण्यासाठी ते काही काळ ऐकावे लागते तसेच चित्र सुद्धा त्या समोर थोडा वेळ थांबून बघावे लागते. सामान्य माणूस चित्रकलेपासून दूर राहतो कारण तो चित्रातील सौंदर्य-स्थानांचा विचार करु शकत नाही. चित्रकाराने काय मांडले आहे, त्याला काय सांगायचे आहे, हे लक्षात घेतले तरच चित्राचे सौंदर्य लक्षात येते. त्यातून मनाला जो सहजी आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. तोच अनुभव सगळ्यांनी घ्यावा या विचाराने चित्रकला शिकणाऱ्यांसाठी, तसेच रसिकांसाठी माझे हे विचार लिखित स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न’ चित्र सौंदर्य – बोध आणि विचार ‘ या पुस्तकात केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Additional information

Weight.320 kg
Dimensions25.5 × 18.5 × 0.9 cm