Baipanachya Goshti (बाईपणाच्या गोष्टी)
₹300.00
मनातलं पानावर …
लेखक हा भावनांशी जखडलेला माणूस असतो आणि मानवी भावभावनांचा गुंता त्याला आपल्या लेखणीद्वारे मोकळा करायचा असतो.. शब्दांच्या साहाय्याने जेव्हा गुंता मोकळा मोकळा होत जातो तेव्हा त्या निर्मितीला आपण साहित्य असे संबोधतो. साहित्याची बीजे त्याला आजूबाजूच्या वातावरणातून मिळत असतात.. काही प्रसंग असे असतात की जे काळजाला भिडतात आणि मग लेखणीतून झरझर उतरतात.
माझ्या प्रासंगिक सदरलेखनाला महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक असलेल्या महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रातून वाव मिळाला आणि ते लिखाण वाचकांच्या मनापर्यंत झिरपत गेले.. वाचकांकडून मला उदंड प्रतिसाद मिळत गेला आणि मीच थक्क झाले.. मी जे शब्दातून मांडत असते अगदी तसेच किंवा थोड्याफार फरकाने वाचकांना देखील वाटत असते अशी जाणीव मला झाली. इतकेच की मी ते सगळ्यांच्या मनातले कागदावर उतरवण्यास यशस्वी झालेली असते. जणू काही माझ्या शब्दांना पंख फुटले आहेत आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत.. त्याक्षणी वाटले की माझे शब्द माझ्यासाठी संजीवनी ठरले आहेत.. शब्दांनी नाते जोपासली गेली आहेत.. लिखाणवाचनाने समृद्ध अशी माणसे मी जोडली आहेत.. अशा रितीने लेखातले शब्द मला नेहमीच सन्मान देत गेले.. मग वाटले की ह्या शब्दांना पुस्तकाची छानशी चौकट द्यावी आणि वाचकांना ते लेख एकत्रितरित्या वाचता यावे याच हेतूने पुस्तकाची आखणी केली आहे. महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने त्यात प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह करण्याची परवानगी देखील दिली.. गेल्या अडोतीस वर्षांपासून पत्रकारितेमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते असे महाराष्ट्र टाइम्स नासिक समूहाचे निवासी संपादक श्री.शैलेंद्र तनपुरे यांनी माझ्या शब्दाला मान देत उत्कृष्ट अशी प्रस्तावना देखील लिहून दिली. २००५ पासून मी वृत्तपत्रीय सदर लेखन करत असल्याची नोंद त्यांनी घेतली. अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तनपुरेसरांचे मनःपूर्वक आभार मानत आहे. महाराष्ट्र टाइम्स मैफल टीमचे प्रशांत भरवीरकर, अश्विनी पाटील तसेच गायत्री कुलकर्णी ह्यांचे देखील मनःपूर्वक आभार ज्यांच्या माध्यमातून माझे लिखाण सुजाण वाचकांच्या पर्यंत पोहोचू शकले आहे.
Description
स्वाती पाचपांडे या समाजजीवनातील विविध विषय अलवारपणे मांडणाऱ्या मनस्वी लेखिका आहेत. त्यांच्या लेखनाशी माझा परिचय साधारण पंधरा वर्षांपूर्वी आला. दै. गांवकरीच्या प्रतिमा या महिलांविषयक पुरवणीसाठी त्या लिहित असल्याने प्रथम त्यांच्या लेखनाचा व नंतर त्यांचा परिचय झाला. घर, कुटुंब, नातेसंबंध व त्याभोवती भिरभिरणारा समाज याला केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी बव्हंशी लेखन केले आहे. पुढे महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल पुरवणीतही त्यांनी लेखनसंचार केला. बाईपणाच्या गोष्टी मांडतांना त्यांच्यातील प्रवाहपतीत न होणारी पण तटस्थपणे परस्परसंबंधाकडे पाहणारी व त्यातून सकारात्मक संदेश देणारी लेखिका प्रकर्षाने समोर येते. घराघरातील बारीक सारीक गोष्टींचा आठव त्यांच्या प्रत्येक कथेत येतो, तेव्हा त्यांच्यातील सूक्ष्मदर्शी व्यक्तिमत्वाचा उलगडा होतो. त्यातून त्यांच्या निरीक्षणशक्तीचा तसेच दांडग्या स्मृतीचाही परिचय होतो. सणवार, उत्सव, भांडीकुंडी, साड्या, दागदागिने आदी महिलांच्या जीवाभावाच्या विषयांना त्या हात घालतात तेव्हा ते चित्र एवढं जिवंत वाटायला लागतं की जणू त्या साऱ्या प्रसंगाचे आपण साक्षीदारच आहोत. एवढेच नव्हे तर पुराणातील गोष्टी, इतिहासातील संस्कार आणि विद्यमान काळ व भविष्यात होणाऱ्या बदलांचा वेध असा सारा आसमंत त्या अलगदपणे उभा करतात. जमिनीशी नातं दृढ ठेवतांनाच आकाशाशीही ते संवादी करण्याचा त्यांचा आग्रह हा इतिहास, वर्तमान व भविष्याला बांधून ठेवणारा सेतू बनून जातो. स्वत: एक महिला असूनही अनेकदा त्या आपल्याच भगिनींच्या दोषांचीही थेटपणे चर्चा करतांना दिसतात, तेव्हा त्यांच्यातील तटस्थपणाचा प्रत्यय येतो. बाईपणाच्या गोष्टी त्या सांगत असल्या तरी त्यात पुरुषांबद्दल दुस्वास नसतो, किंबहूना हा भवसागर तरुन नेण्यासाठी या दोन्ही घटकांमधील संवादाची कशी आवश्यकता आहे, गरज आहे हेच अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्नही अनेक लेखांमध्ये दिसतो. लेख वा कथा लिहितांना त्या अनेकदा गाजलेले संगीत, चित्रपटातील गाणी, संताच्या रचना, शायरी, गझल असा विविधांगी खजिना उघड करतात तेव्हा त्यांच्यातील अष्टपैलुत्वाचे दर्शन होते. ललितलेखनात त्यांचा हातखंडा आहे. त्यातूनच अलगदपणे पुढे आलेल्या या बाईपणाच्या गोष्टी वाचकांना खिळवून ठेवतील,
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Additional information
Weight | 0.295 kg |
---|---|
Dimensions | 21.5 × 14.5 × 1.2 cm |