You are currently viewing वाचन ज्ञानाचे महाद्वार !!!

वाचन ज्ञानाचे महाद्वार !!!

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. नव्या जगात, नव्या युगात ह्यात आणखीन भर पडत आहे. त्यातील एक प्रमुख गरज म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजेच पर्यायाने साक्षरता, सुशिक्षितता. महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. जीवन सफल, संपन्न होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे आणि शिक्षणाचा पाया म्हणजे साक्षरता. विविधांगी वाचन हा देखील साक्षरतेचा पुढचा एक टप्पा आहे. सामान्यतः साधे, सोपे, जे मिळेल ते वाचने, फारसी निवड न करता वाचणे याकडे पुष्कळांचा कल असतो. वाचन हे विचारपूर्वक, हेतुपूर्वक करायला हवे. आपल्या वाचनाच्या दर्जा विषयी जर आपण उदासीन असू तर, काही काळानंतर आपणास जाणवेल की वाचन तर भरपूर झाले परंतु ते सारंच भरकटणं होतं, वेळ घालवणं होतं. शारीरिक अपंगत्व लगेच दिसून येतं. शारीरिक अपंगत्वाचे परिणाम त्वरीत लक्षात येतात तसे मानसिक अपंगत्वाचे नसते ते, सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे होणारे दुष्परिणाम इतरांच्या व स्वतःच्याही तात्काळ लक्षात येत नाहीत. शारीरिक अपंगत्वाबाबत आपण सदैव सजग असतो परन्तु मानसिक अपंगत्वाबाबत अंधारातच असतो. मानसिक पंगुत्व येऊ देणे अथवा न येऊ देणे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. फक्त आपण त्याबाबत जागरूक असावयास हवे म्हणूनच वाचन हे केवळ वाचनाच्या स्तरावर न राहता ते तुमच्या मानसिक प्रगल्भतेला पुरक असे असायला हवे. प्रत्येक यशस्वी व्यक्ति ही संस्कारीत असते. साहित्याच्याच क्षेत्रात नव्हे तर सर्वच क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिंच्या जीवनात विवेकपूर्ण व सजग वाचनाचा म्हणजेच पुस्तकांचा फार मोठा वाटा असतो. अशा व्यक्तिंचे वाचन अफाट असते. नंतर त्यावर चिंतन, मनन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आचरण झालेले असते. अशारितीने त्यांची वैचारिक बैठक पक्की होते आणि ते आपल्या ध्येयाच्या दिशेने अधिकाधिक अग्रसर होतांना दिसतात. जुन्या पिढीतील टिळक, आगरकर, गांधी, नेहरू हे सक्रीय राजकारणात व्यस्त असूनही  ते विचारवंत म्हणूनही प्रसिद्धी पावलेले होते. आजच्या युगातील आपणा सर्वांना ज्ञात आणि प्रिय असलेले आणि काळावर स्वतःच्या बुद्धी आणि आचरणाचा ठसा कायमस्वरूपी सोडणारे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे केवळ त्यांच्या पदांमुळे नव्हे तर दूरदृष्टी असणारे द्रष्टे पुरूष म्हणून तुम्हा-आम्हाला सुपरिचित आहेत. या आणि अशा अनेक थोर व्यक्तिंच्या जीवनाकडे पाहिले तर असे दिसून येईल की त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे, अफाट पण सुयोग्य असे वाचन केलेले आहे.  सकस, चांगले अन्न जसे सुदृढ शरीर घडवते तद्वत सकस, सजग वाचन हे माणसाला घडवत जाते. निसर्गतः माणूस अनुभवाने शहाणा होत जातो. परन्तु हे अनुभव फक्त त्याच्या स्वतःपुरतेच मर्यादित असतात. वाचनामुळे इतर हजारो, लाखोंचे अनुभव अपणास ज्ञात होतात. इतरांनी केलेल्या कष्टांचा, ज्ञानाचा, संशोधनाचा वाचक हा केवळ वाचनाद्वारे लाभ करून घेऊ शकतो.एकप्रकारे ज्ञान, शहाणपण मिळविण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. आपण अनेक आयुष्ये एकावेळेस जगू शकत नाही परन्तु इतरांच्या आयुष्यातील काही क्षण, ज्ञानकण नक्कीच वेचून घेऊ शकतो. कमी कालावधीत आपण सुजाण, ज्ञानी होऊ शकतो आणि हे  फक्त उत्कृष्ट ज्ञानाद्वारेच, ग्रंथांद्वारेच घडू शकते.
म्हणून वाचन-वाचक चळवळ ही महत्त्वाचे कार्य करू शकते. या चळवळीद्वारे चांगल्या ग्रंथांची पर्यायाने चांगल्या विचारांची देवाण-घेवाण आपण इतर वाचकांबरोबर करू शकतो. नव्या पिढीला घडवू शकतो. या चळवळीत अल्टिमेट असोशिएट्स ही एक सक्रिय भाग घेणारी प्रकाशन संस्था आहे. अल्टिमेट असोशिएट्स द्वारे आम्ही एक महाराष्ट्रव्यापी कृती कार्यक्रम घडवून आणू इच्छितो. आमच्या प्रकाशन संस्थेची काही निवडक प्रकाशने पुस्तक स्वरूपात आहेत ती महाराष्ट्रभरातील आपल्यासारख्या सर्व चोखंदळ वाचकांसाठी विशेष सवलतमुल्यात आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. आपण स्वतः ह्या चळवळीचा घटक बनून ही चळवळ आपल्या परिसरात भरभराटीस आणू शकता. जेणे करून ही चळवळ जोमाने उभी राहील. वाचकांच्या वाचनामध्ये सजग वाचनाचा अंतर्भाव करून आपण एक सुदृढ मनाचा भारतीय नागरिक घडवण्यात त्याची मदत करू शकता.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!