You are currently viewing मुद्रण व्यवसाय -कोव्हिड काळात आणि नंतरही

मुद्रण व्यवसाय -कोव्हिड काळात आणि नंतरही

मुद्रण क्षेत्र गेल्या दोन शतकांपासून सतत प्रगत अतिप्रगत होत आले आहे.नानाविध प्रकारच्या तंत्रांची जोड मिळत-मिळत मुद्रण क्षेत्र आज ज्या स्थितीमध्ये आहे तो आवाका नक्कीच डोळे दिपवणारा आहे. त्यामुळेच मुद्रण क्षेत्र हे व्यवसायाच्या दृष्टीने नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. मुळात अनेक तंत्रांची सरमिसळ असल्याने सुरुवातीपासून ते आजपर्यंत छपाई होऊन समोर येणारा एखादा कागद किंवा पुस्तक हे अनेक कुशल तंत्रज्ञ समूहांच्या साह्याने होत असते. त्यात गेल्या दोन ते तीन दशकात आणखी एक आव्हानात्मक बाब समाविष्ट झाली ती म्हणजे कमीत कमी वेळेत अधिकाधिक सुबक मुद्रण ग्राहकांपर्यंत पोहोचविणे. तंत्रज्ञान आत्मसात करणे, ते वापरण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हे जसे आव्हानात्मक आहे तसेच काही नैसर्गिक आपत्ती सुद्धा मुद्रका समोर नवीन आणि अनपेक्षित आव्हाने उभे करीत असतात. त्यापैकी एक म्हणजे covid-19.
साधारणतः सप्टेंबर 19 ला जगभरातील काही भागात covid वायरस याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आणि सर्वसामान्यांपर्यंत covid-19 हा काय आजार आहे, त्याचे परिणाम काय आहेत ?, हे समजण्याआधीच साधारणतः डिसेंबर 19 च्या अखेरीस भारतात covid-19 चे आगमन दक्षिण भारतातील काही शहरांमधून नोंदविले गेले. सुरुवातीला सगळ्यांनी ह्या साथ रोगाला विशेष महत्त्व दिले नाही. जनता, प्रशासन आणि सरकार यांच्या लक्षात येण्याआधीच या साथीच्या रोगाने आपले घातक रूप आपणा सर्वांसमोर विविध माध्यमातून आणले आणि मार्च 2020 पर्यंत संपूर्ण जगात covid-19 ने हाहाकार माजवला सुरुवात केली तेव्हापासून ते आजपर्यंत covid-19 याची इतकी चर्चा झाली आहे की त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता उरत नाही.
covid-19 ने प्रत्येक व्यक्तीला संपर्क रहित करून टाकले त्यामुळे सर्वच व्यवसाय जे की प्रत्यक्ष व्यक्ती समूहांशिवाय होऊ शकत नाही त्यांच्यासमोर बंद होऊन ठप्प होणे याशिवाय पर्याय उरला नाही. यातून मुद्रण व्यवसाय तरी कसा अलिप्त राहू शकेल ? त्यालाही या आजाराने ग्रासले.
मार्च 2020 पासून आजतागायत 70 ते 80 टक्के व्यवसाय कधी बंद तर कधी चालू राहिल्याने मुद्रित साहित्याची मागणी झपाट्याने खालावली.
मुद्रण व्यवसायाचे ढोबळमानाने त्यातील प्रकारानुसार विभाजन करायचे ठरविले तर  60 टक्के पुस्तक छपाई आणि 40% व्यावसायिक आणि नैमित्तिक छपाई असे करता येईल. covid मुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने शालेय पुस्तकांची विक्री बंद. पर्यायाने उत्पादन बंद झाले. पुस्तक उत्पादनात सर्वात मोठा मागणी स्त्रोत बंद झाला. त्याचबरोबर अवांतर वाचनासाठी लागणारी पुस्तके विक्री बंद झाली. त्यांच्या मागणीत साधारणपणे 45 टक्के घट नोंदवण्यात आली. आघाडीचे शंभर दिवाळी अंक निर्मात्यांनी या वर्षी अंकच छापले नाहीत. उरलेल्या काही निर्मात्यांनी दिवाळी अंक नावाला नेहमीच्या छपाईच्या प्रतींपेक्षा 20 टक्के इतकेच छापले, (80 टक्के घट) शिवाय जे छापले गेले त्यांच्या मागणीत सरळ सरळ 35 टक्के घट नोंदविण्यात आली. शिवाय ज्यांनी मागणी नोंदविली त्यांच्यापर्यंत पुस्तके, अंक पोहोचवण्यात प्रचंड अडचणी आल्या आणि नेहमीपेक्षा अधिक पैसे खर्च करावे लागले, त्यामुळे नफ्याचे प्रमाण नगण्य झाले.
व्यावसायिक छपाई क्षेत्रात मागणी झपाट्याने घसरली आणि त्यातील काही प्रकारची छपाई तर कायमस्वरूपी बंद झाली. व्यावसायिक आणि विक्री वृद्धी साठी लागणारे मुद्रण साहित्य सुद्धा कंपन्यांनी छापण्याचे रद्द केले. अनेक मोठ्या कंपन्या /संस्था यांनी दरवर्षी छापली जाणारी कॅलेंडर, डायरी, ब्रोशर्स, कॅटलॉग हे छापले नाही किंवा डिजिटल पद्धतीने बनवून पाठविण्याचे धोरण अवलंबिले.याचे एक उदाहरण म्हणून सांगता येईल की भारतातील विमा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था एलआयसी दरवर्षी कमीत कमी 25 कोटी डायरीज छापते. त्यांनी 2020 आणि 2021 मध्ये डायरी आणि कॅलेंडर छापले जाणार नाही असे जाहीर केले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सरकारी मोठ्या बँका आणि इतर संस्था यांनी सुद्धा तोच कित्ता गिरवला.
नैमेत्तिक छपाई जसे की लग्न पत्रिका, वेगवेगळ्या प्रदर्शनासाठी लागणारे हॅण्ड बिल्स, व्हिझिटिंग कार्ड्स हे बंद झाले आणि सरळ सरळ डिजिटल स्वरूपात स्थिरावले, रुळले देखील.
भारतातील मुद्रण क्षेत्रातील एक दिग्गज आणि आघाडीची संस्था ‘प्रिंट वीक’ यांनी नोव्हेंबरमध्ये एक सर्वे केला त्यानुसार सुक्ष्म आणि लघु (मायक्रो अँड स्मॉल) अडीच लाख व्यवसायिकांनी पैकी 80 ते 85 टक्के व्यावसायिक हे आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यापैकी 27.3 टक्के छपाई व्यावसायिक हे उद्योग बंद करण्याच्या काठावर आहेत. नोंदविलेले किमान तीन हजार छपाई उद्योग हे मार्च 21 मध्ये कायमस्वरूपी बंद झाले आहेत. कागद उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये या काळात कागदाची मागणी ही सर्वकालीन नीचांकी पातळीवर नोंदवली गेली. ती काही भागात तीस टक्के (70 टक्के घट )इतकी खाली आहे तर इतर ठिकाणी 40 ते 45 टक्के म्हणजेच 60 ते 55 टक्के घट नोंदविण्यात आली आहे त्यामुळे कागदाचे दर 40% वाढून एका नवीन आव्हानाला मुद्रक उद्योजकाला सामोरे जावे लागत आहे. इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये 30 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
प्रकाशन व्यवसायिकांबाबत केलेल्या सर्वेनुसार 40% प्रकाशक म्हणतात की दहा ते बारा महिन्यांमध्ये त्यांचा व्यवसाय covidपूर्व स्तरावर येईल पण उरलेले 60% प्रकाशक म्हणतात की त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप बदलून आता आगाऊ नोंदणी करून त्यानुसारच पुस्तके छापली जातील. त्याच बरोबर सर्व प्रकाशकांनी ई-बुक छापण्याचे तंत्र अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
अजून एक दुःखदायक पण आवश्यक असा बदल आघाडीचे छपाई उद्योजक करण्यावर ठाम आहेत की ते इथून पुढे माणसावर कमी आणि तंत्रावर अधिक जोर देऊन (डिजिटायझेशन) व्यवसाय करणार आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर एक नक्की आहे की मुद्रण व्यवसायिकाला काळाची पावले ओळखून, भविष्याचा वेध घेत,स्वतःच्या व्यवसायात बदल तर करावेच लागतील पण स्वतःमध्ये, स्वतःच्या दृष्टिकोनातही बदल करावे लागतील. त्यामध्ये अधिक कल्पकतेने आणि हार न मानता आक्रमकतेने व्यवसायातील आव्हानांना सामोरे जात हे युद्ध जिंकावे लागेल यात काहीही शंका नाही. जेव्हा संकटे वेगाने येतात तेव्हा हात पाय न गाळता त्याच्या एवढंच आक्रमकतेने त्याला सामोरा जाणाराच टिकतो. जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न असतो तेव्हा-तेव्हा जे-जे म्हणून बदल आवश्यक आहेत ते ते करण्यातच खरी उद्योजकता दडली आहे. दरवाढ करणे, आपल्या व्यवसायाचे किमान स्थिर दर निश्चित करणे. व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे (डिजिटायझेशन करणे), एकाच मोठ्या ग्राहकावर अवलंबून न राहता स्वतःचा ग्राहक निर्माण करणे (ब्रँड उभा करणे)स्वतःची स्वतंत्र वितरण व्यवस्था निर्माण करणे यासारख्या अनेक बाबी करीत व्यवसाय पुढे नेण्याचे आव्हान मुद्रकासमोर आहे.
सर्वांना असा आक्रमक दृष्टिकोन लवकरात लवकर प्राप्त होवो अशा शुभेच्छा….!!!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

*बिपिन बाकळे*