You are currently viewing प्रज्ञा प्रतिमा अर्थात Visual Intelligence

प्रज्ञा प्रतिमा अर्थात Visual Intelligence

त्वचा, कान, नाक, जीभ व डोळे या इंद्रियांद्रारे अनुक्रमे स्पर्श, ध्वनी, गंध, चव व दृष्य याचे ज्ञान आपल्याला होते. या सर्वांना म्हणूनच आपण ज्ञानेंद्रिये म्हणतो. प्रत्यक्ष जाणीव आपल्याला मेंदूच करून देतो. ही इंद्रिये त्या त्या संवेदनांचे विद्युत संदेश मेंदूतील विविध भागात पोहचविण्याचे काम करतात. या संवेदनांची जाणीव करून देताना मेंदू त्याची अशी ‘बुद्धी’ किंवा ‘प्रज्ञा’ वापरतो. प्रत्येक संवेदनेसाठी मेंदू वेगवेगळी बुद्धी वापरतो असा तर्क करायला हरकत नाही. मला जे दृष्य दिसते तसेच ते इतर 99 टक्के व्यक्तिंना दिसते, मला जो स्पर्श जसा वाटतो तसाचे तो 99 टक्के व्यक्तिंनाही जाणवतो. त्या-त्या प्रकारची विशिष्ट प्रज्ञा निसर्गाने माणसाला सारखी दिली आहे. ही कोणी, कोणाला, कधीही शिकवत नाही. ऐकावे कसे ? चव कशी घ्यावी याचे सारे ज्ञान जन्मजात असते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

विशिष्ट जाणीव करून देताना मेंदू त्यासाठी त्यानेच तयार केलेले नियम अगदी काटेकोरपणे पाळतो. 1980 पासून या संदर्भात संशोधनाला सुरवात झाली. डोळ्यात पडणार्‍या प्रतिमेमागची मेंदूची प्रज्ञा किती प्रगल्भ असते ते आता आता आपल्याला समजू लागले आहे. मेंदू प्रतिमेसाठी एकूण किती नियम वापरतो कोण जाणे पण त्यातले काही आपल्या हाती आले आहेत. मेंदू हे सारे कसे करतो ?  हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण क्रमशः करणार आहोत. ते नियम समजण्यासाठी आपल्याला काही प्रयोग करावे लागतील, काही सोप्या आकृत्यांचे निरीक्षण करावे लागेल. विज्ञानाचा हाच तर मार्ग असतो. यातल्या काही आकृत्या तुम्ही आधी पाहिल्या असतील. तेव्हा तुम्ही त्याला दृष्टिभ्रम म्हटले असेल. त्यामागे असलेली मेंदूची प्रगल्भता, प्रज्ञा, बुद्धी  आता-आता आपल्याला समजू लागली आहे. बर्‍याचशा आकृत्यांमध्ये जे नाही ते मेंदू आपल्याला दाखवतो व ‘दिसते तसे नसते’ या म्हणीमागचा शास्त्रीय पुरावाच आपल्या समोर ठेवतो.

हे सर्व नियम मेंदूनेच तयार केलेले असतात. कधी कोणता नियम वापरायचा हा निर्णयदेखील मेंदूच घेतो. काय दाखवायचे व कसे दाखवायचे हे सारे मेंदूने ठरविलेले, रचलेले असते. यात आपली भूमिका शब्दशः बघ्याची असते. वस्तूचे रंग, हालचाल वा गती यासाठीसुद्धा मेंदू नियम वापरतो व तेही अगदी काटेकोरपणे! मेंदू असे का करतो यामागची कारणमिमांसा आपल्याला माहित नाही. परंतु हे फार अद्भूत आणि विस्मयकारी मात्र आहे. 

आपला मेंदू ह विलक्षण असे यंत्र आहे. ज्ञानाची अंतिम मर्यादा, असे मेंदूचे वर्णन केले जाते. मात्र हि अंतिम मर्यादा गाठण्यासाठी मानवाला किती वर्षे लागतील हे काही माहित नाही. नवनवीन यंत्रांच्या साहाय्याने मेंदूमधील कार्यान्वित असलेल्या भागांची छायाचित्रे घेऊन मेंदूचे कार्य समजून घेण्याचा प्रयत्न जारीने चालू आहेत. त्यामध्ये थोडफार यशही येत आहे, पण अजूनही, एका अर्थाने  निर्जीव असलेल्या अब्जावधी पेशींपासून मेंदू एकात्म मन कसे तयार करतो हा प्रश्न अनिर्णितच आहे.

मानवापाशी असलेल्या पाच ज्ञानेद्रियांमध्ये दृष्टी हे सर्वात महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. वस्तुतः एखादा कॅमेरा असावा अशीच डोळ्यांची रचना आहे. कॅमेर्‍याप्रमाणेच डोळ्याच्या पटलावर वस्तूची उलटी प्रतिमा उमटते आणि रॉड व कोन या पेशींमार्फत ती मेंदूच्या पिछाडीला असलेल्या दृष्टीकेंद्राकडे जाते. त्याठिकाणी एकाचवेळी येणार्‍या कोट्यवधी संदेशांचे एकत्रीकरण करून मेंदू वस्तूची एक सलग प्रतिमा कशी निर्माण करतो, ही सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे.

बुद्धीचे अनेक प्रकार असतात, असे आता सिद्ध झाले आहे. भाषिक, तार्किक, गणिती, शारीरिक, सांगीतिक असे बुद्धीचे किंवा प्रज्ञेचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये प्रतिमा प्रज्ञेची भर पडली आहे. जी प्रतिमा आपल्याला वस्तूच्या प्रतिमेचे सम्यकदर्शन घडविते, तिला प्रतिमा-प्रज्ञा म्हणता येईल. ज्याला आपण दृष्टीभ्रम म्हणतो, तो वस्तुतः दृष्टीने निर्माण केलेला भ्रम नसून प्रतिमा प्रज्ञेने काही विशिष्ट नियम वापरून निर्माण केलेले दृश्य असते. 

प्रतिमा निर्माण करीत असताना प्रज्ञा वस्तूंचे गट करीत असावी असा शास्त्रज्ञांचा संशय आहे. साधर्म्य, नजिकता, सातत्य, पूर्व परिचय अशा मार्गांनी वस्तूच्या प्रतिमांचे दर्शन प्रज्ञा घडवित असावी. आपल्याला काय दिसणार, ही गोष्ट आपण कोणत्या बिंदूवर दृष्टी केंद्रित करतो यावर बहुदा अवलंबून असावे. ही बाब ‘नेकरचा घन’ या आकृतीवरून अधिक स्पष्ट होते.

सन 1832 मध्ये लुई अलबर्ट नेकर यांनी हा घन प्रथम मांडला. नेकर हा एक गाढा स्विस तत्वज्ञानी होता. प्रस्तुत घनास ‘नेकरचा घन’ म्हणतात. ही आकृती सपाट प्रतलावर आहे त्यामुळे अर्थातच ती द्विमिती आहे. दृष्टीला मात्र सहा पृष्ठभाग असलेली एक घनाकृती दिसते. त्या घनाचे कोपरे, कडाही जाणवतात. आकृतीत त्या घनाचे दोन कोपरे अ व ब असे दाखविले आहेत. त्याचा उपयोग आपण जे दिसते त्याच्या वर्णनासाठी करू शकू.

आकृतीकडे टक लावून बघा. काय दिसते? एक घन दिसतो ज्याचा ‘अ’ कोपरा पुढे आहे व ‘ब’ मागे. पुढील क्षणी जो घन दिसतो; त्यात ‘ब’ कोपरा पुढे दिसतो तर ‘अ’ मागे. तसेच पाहात राहिलात तर हे दोन प्रकारचे घन

तुम्हाला आलटून पालटून दिसतात. यासाठी नेकरने एक प्रश्न मांडला. जेव्हा तुम्ही या घनाकडे पाहत नाही तेव्हा कोणता कोपरा पुढे असतो? ‘अ’ की ‘ब’? की दोन्ही नाही. वरवर विचित्र वाटले, सोपे वाटले तरी हे प्रश्न तसे नाहीत.

हे प्रज्ञा प्रतिमेचे म्हणजेच Visual Intelligence चे एक उदाहरण आहे. अशी अनेक प्रकारची उदाहरणे आहेत जी आपण क्रमशः बघू या !