You are currently viewing प्रज्ञा प्रतिमा अर्थात Visual Intelligence – 2

प्रज्ञा प्रतिमा अर्थात Visual Intelligence – 2

असे म्हणतात की, राजाच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे राज्याचा सर्व कारभार चालायचा. राजा तेव्हा सर्वज्ञ असे, व्यवहारी असे, चतुर, हुषार असे. शूरवीर असे.आपल्या राज्याचे हित, अहित त्याला चांगलेच अवगत असायचे. अशी व्यक्ती मग सम्राट पदास पोहोचायची. तीही त्या पदाशी प्रामाणिक असायची.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शरीराचा राजा म्हणजे मेंदू ! खरा अनभिषिक्त सम्राट. मन नावाची एक अमूर्त गोष्ट निर्माण करून त्याद्वारे मूर्त शरीरास ताब्यात ठेवणारा मेंदू. शरीरातील सर्व पेशी, उती, अवयव व शरीरसंस्था यांत जे जे काही घडते, व्यक्तिला जे जे जाणवते, भावते ते ते तसे दाखवणारा बुद्धिमान, प्रज्ञावंत असा मेंदू.

भोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते ती मेंदूला; मग ती तो आपल्याला करून देतो. आपण मात्र म्हणतो की, जाणीव करून देतात ती ज्ञानेंद्रिये. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपल्याला जे व जसे जाणवते ते व तसे सर्व मेंदूने निर्माण केलेले असते. मेंदू हा सर्वांत सर्जनशील अवयव आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मेंदूची सर्जनशीलता केवळ ‘दिसणे’ वा ‘दृष्य’ या प्रक्रियेशी वा संकल्पनेपुरती मर्यादित नसून ती स्पर्श, चव, ध्वनी, गंध याही बाबतीत दिसून येते. यापुढील प्रकरणातून केवळ ‘दिसणे’ व ते तसे दाखवण्यामागे मेंदू करीत असलेली प्रक्रिया, मेंदू वापरत असलेली बुद्धी वा प्रज्ञा हा विषय मांडला आहे. आपल्याला जे व जसे दिसते, ते व तसे मेंदूने दाखवलेले असते. दुसऱ्या शब्दात असेही म्हणता येईल की मेंदूजे व जसे दाखवेल ते, तसे आपण पाहतो – म्हणजे तसे आपल्याला दिसते. थोडक्यात, दृष्टी बुद्धिमान असते असे म्हणता येईल. याच अर्थाने ‘प्रज्ञा – प्रतिमा’ हा शब्द वापरला आहे. प्रतिमा म्हणजे आपल्याला जे दिसते ते. त्या प्रतिमेमागची मेंदूची बुद्धी वा प्रज्ञा. बुद्धिवाचून प्रतिमेचे अस्तित्व शून्य असते. ही प्रज्ञा जर निकामी झाली तर आपल्याला जरी दिसले, तरी ‘दिसत’ नाही म्हणजे जे पाहिले ते नुसते पाहिले जाते. जे पाहतो त्याचे आकलन होत नाही.डोळ्यातल्या रेटिनावर म्हणजे प्रतिमापटलावर प्रतिमा फक्त पडते.

तिच्यातील प्रकाश उर्जेमुळे जे विद्युत संदेश तयार होतात ते मेंदूपर्यंत जातात. प्रतिमापटलावरच्या प्रतिमेत आशयाचा जीव असत नाही. मेंदू तो आशय भरतो व मग प्रतिमा सजीव होते. पुढे सांगितलेल्या सत्य घटनेच्या उदाहरणावरून याचा अर्थ अधिक कळू शकेल.

एका व्यक्तीला एकदा ‘स्ट्रोक’ म्हणजे आघात झाला. जेव्हा मेंदूतील एखाद्या भागात रक्तपुरवठा कमी होतो किंवा अजिबात होत नाही त्यावेळी निर्माण होणाऱ्या स्थितीस ‘आघात’ असे म्हणतात. या व्यक्तीची स्मृती व सर्वसाधारण बुद्धिमत्ता आघातानंतर शाबूत होती. ती व्यक्ती पूर्वीप्रमाणे बोलू, वाचू, लिहू शकत होती. दृष्टी एकदम छान होती. पाहिलेला चेहरा कोणाचा आहे हे मात्र ती ओळखू शकत नव्हती. त्याला डोके, नाक दिसे, जिवणी,हनुवटी,कानाची ठेवण दिसायची पण – पण या सर्वांतून तयार होणारा चेहरा – तोच ओळखू यायचा नाही. एरवी दिसणारा चेहरा स्त्रीचा की पुरुषाचा, तरुण की प्रौढ, बाल की वृद्ध आहे हे आपल्याला क्षणात कळते, जाणवते. त्या बिचाऱ्या रुग्णाची हीच क्षमता लोपली होती. पोषाखावरुन ती व्यक्ती स्त्री का पुरुष हे तो ओळखू शके. कळस म्हणजे आरशात पाहताना स्वतःचा चेहरा अनोळखी, नवखा वाटे. प्रतिमेच्या मागे तिचे आकलन होण्यासाठीची प्रज्ञाच नव्हती, ती हरवली होती. हाच खरा आघात होता.

व्यक्तीचा बुध्दयांक व कारणमीमांसा सबळ तत्त्वांवर घासून घेणारी बुद्धिमत्ता आपल्याला पूर्वीपासून माहित होती. मात्र भावनिक बुद्धिमत्ता किंवा आणि तिचे महत्त्व आपल्याला अगदी गेल्या एकदोन दशकांत झालेल्या मानसशास्त्र व मज्जाविज्ञान या दोन शाखांच्या अभ्यासातून समजले आहे. एरवी आपण आपल्यात असलेल्या या क्षमतेविषयी अगदी अनभिज्ञ असतो. ही क्षमता कमी झाली किंवा नष्ट झाली तरच तिचे महत्त्व कळते. जसे आपली मान धरली की तेथील स्नायूंचे वा कमरेत उसण भरल्यावर तेथील स्नायूचे महत्त्व कळते. नाहीतर त्या त्या स्नायूना आपण गृहित धरून चाललो असतो. दृष्टी ही अत्यंत सहज, खात्रीशीर, माहितीपूर्ण व विश्वासार्ह असते. तिच्यातील अतिसरलताच आपल्याला चकवते. आपणही असे समजतो की, ही दृष्टी कष्टाविनाच प्राप्त झाली आहे. गायकाची एखादी तान, वाद्यावरची एखादी सुरावट आपल्याला सहज वाटते; पण त्यामागे असलेल्या कलाकाराच्या परिश्रमाचा व सरावाचा आपल्याला विसर पडतो. केवळ दृष्टीचा विचार केला तर मोठ्या मेंदूतील सर्वाधिक मोठ्या आकारमानाचा भाग ‘दृष्य केंद्र’ म्हणून कार्य करतो.

यावरून सजीव जीवनात त्याचे महत्त्व सहजच लक्षात येईल. प्रज्ञाप्रतिमा जाणून घेणे म्हणजे एका अर्थी आपण आपल्याला जाणून घेणे होय.

सजीवाच्या जीवनात प्रतिमा हे सर्वस्व आहे. जीवनाची सारी मदारच त्या प्रतिमेवर व तिच्या होणाऱ्या आकलनावर आहे. हे आकलन मेंदूमार्फत होते. त्यासाठी मेंदू त्याची खास प्रतिमाकलनासाठीची बुद्धी – प्रज्ञा वापरतो. उत्तम साहित्य जसे आपल्या वैचारिकतेला खाद्य असते, एखादी भावस्पर्षी सुंदर कथा काळजाला हात घालते, तसेच आपण पाहत असलेले प्रत्येक दृष्य हे प्रतिमा रचणाऱ्या प्रज्ञेला आव्हान असते. विसाव्या शतकातील शेवटच्या दशकात दृष्टी संबंधाने झालेल्या संशोधनातून आपल्याला काही गोष्टी समजल्या आहेत. त्या ‘कळल्या’ आहेत हे म्हणणे जरा धाडसाचे होईल. दृष्टी ही अकार्यशील, उदासीन नसून ती सक्रीय असते हे नक्की. प्रायोगिक पुराव्याधारे जसा एखादा वैज्ञानिक वा विचारवंत उपयुक्त उपपत्ती मांडतो तशी डोळ्यातील दृष्यपटलावर – रेटिनावर – पडणाऱ्या प्रतिमेतून दृष्टीसाठीची प्रज्ञा ही आपणासमोर प्रगल्भ असे दृष्यवैभव उभे करते. प्रतिमेचे आपल्याला आकलन व्हावे त्यासाठी मेंदू जी प्रज्ञा वापरतो व जे जसे रचून दाखवतो तसेच आपल्याला दिसते. कदाचित जे जसे दिसते ते तसे नसेलही; पण – प्रज्ञा जे दाखवेल ते; आपण पाहतो. दुसरा पर्याय आपल्यासमोर नसतो. दृष्टी संस्थेची बुद्धिमत्ता अक्षरशः अचाट, अगाध आहे. विचारवंत वैज्ञानिक जेव्हा एखादी उपपत्ती मांडतो, तेव्हा ती त्याने समजून जाणीवपूर्वक मांडलेली असते, परंतु प्रज्ञा प्रतिमा जे जे जाणवून देते त्याची प्रक्रिया ना आपल्याला कधी कळते, ना त्याचे कधी भान आपल्याला असते.

प्रज्ञा प्रतिमेच्या या अचाट क्षमतेने खूप पूर्वीपासून अनेकांना भुरळ घातली आहे. वस्तूचे रंग, रंगाच्या छटा, आकार, नक्षीकाम, वस्तूत आपततःच असलेली स्थिरता, मुद्दाम घडवून आणलेली हालचाल याचे आपल्याला होणारे ज्ञान ज्या प्रक्रियेमुळे होते ती अगदी अनाकलनीय म्हणायला हवी. दृष्टीच्या अभ्यासातून बरीच रहस्ये उलगडली आहेत. निदान तसे आपल्याला वाटते. एकूण किती रहस्ये आहेत याचा काहीच अंदाज आपल्याला नाही. खूप काही कळल्यासारखे वाटत असले तरी न कळलेलेही बरेच आहे हे भान आपल्याला आहे. मेंदूबद्दलच्या कुतूहलापोटी संशोधक संशोधन करीत आहेत, सतत नवे प्रयोग आखत आहेत, करत आहेत. विज्ञानाचा अभ्यास केला की आपले आश्चर्य कमी होते असे आपण मानतो. मेंदूसंदर्भात मात्र हे विधान खरे नाही. जे घडते ते उलटेच! इथे सुटणारा प्रत्येक प्रश्न दहा नवे प्रश्न समोर ठेवतो. सुटलेल्या प्रश्नाची उत्तरे हीसुद्धा प्रश्नच असण्याची अद्भूत अनुभूती मेंदूच्या अभ्यासातून मिळते. मेंदूची एकूण करामत बघून त्याला देणगी का म्हणायचे व मानायचे ते कळते. आपण आपल्यालाच किती अज्ञात असतो हे कळते. सर्व सजीवांमध्ये असलेला मेंदू ही एक उत्क्रांत झालेली सर्वांत प्रगल्भ, अमूल्य देणगी आहे.पुढील प्रकरणातून प्रतिमेमागची प्रगाढ प्रज्ञा समजून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. आकृत्या, चित्रे यांच्या आधारे हे विवेचन केले आहे. वाचकांचा यात सक्रिय सहभाग गरजेचा आहे. वाचतावाचता काही प्रयोग करायला सांगितले आहेत, ते करायचे आहेत. आकृत्या बघून विवेचन समजून घ्यायचे आहे. त्यावरुन प्रज्ञा ही किती अफलातून बाब आहे हे वाचकाच्या ध्यानात येईल.