You are currently viewing कला आणि मी

कला आणि मी

1981 साली वयाच्या दहाव्या वर्षापासून मेरी या कॉलनीमध्ये राहायला आल्याचं आठवतं… कालनी वसत असतानाच. आमच्या समोरच कॉलनीतील सर्व इमारती बांधल्या गेल्याचं चांगलच आठवतं, इमारती बांधण्यासाठी आणलेल्या वाळूत खेळतच लहानाचा मोठा झालो. मेरीमधील निसर्गरम्य वातावरण, साधारणतः 2500 कुटंबांची कॉलनी असूनही एका कुटुबाप्रमाणं वागणाारी माणसं. घरापासून हाकेच्या अंतरावर असणारी पेठे हायस्कूलची नवीन झालेली आणि अल्पावधीतच संस्थेच्या नावलौकीकात भर घालणारी भव्य इमारत आणि पटांगण असलेली शाखा. ती ही इतकी जवळ की शाळेची घंटा वाजली आणि घरातून निघालो तरी घंटा देऊन संपण्याच्या आत शाळेत दाखल.  शाळेची जसी इमारत नवीन तसेच सर्व शिक्षकवृंदही नवीनच. सगळ्यांच्याच मनात आणि कृतीत काहीतरी छान करून दाखविण्याची उर्मी. त्यामुळे शाळेतही नवनवीन उपक्रमांची रेलचेल आणि सर्वांचा वाखाणण्याजोगा सहभाग. मुलांबरोबरच पालक आणि शिक्षकही तितक्याच हिरीरीने उपक्रमात झोकून देणार… सातवीला असताना ड्रॉर्ईंगच्या सुर्यवंशी सरांनी एलीमेेंंटरीचा फॉर्म भरायला सांगितला आणि ड्रॉर्ईंगचा क्लास सुरु झाला. शाळेच्या वेळेनंतर होणारा क्लासचा तास हा नित्याचा झाला आणि असं लक्षात आलं की, आपली चित्रकला बरी आहे.  वडील ड्राफ्ट्समन असल्यानं घरात कलेचं वातावरण होतंच, माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचं ड्रॉर्ईंगही चांगलंच होतं. पण मी अत्यंत आळसी आणि बेफिकीर आहे असं सरांच निरीक्षण होतं आणि ते खरं ही होतं, सर मला नेहमी म्हणायचे जर तु कोणतीही गोष्ट मनापासून केलीस तर त्यात तुला यश मिळेलच पण मी मुडी असल्याने मला वाटलं तरच मी कोणतीही गोष्ट करायचो आणि आजही करतो. मला चांगल आठवतं एकदा कॅम्लीन कंपनीची कोणतीसी चित्रकला स्पर्धा होती, माझ्या दोन नंबरच्या बहिणीला सरांनी त्या स्पर्धेेत भाग घ्यायला लावला होता आणि मलाही त्यात भाग घ्यायचा होता पण सुर्यवंशी सर तयार नव्हते. एकाच घरातून दोनजण भाग घेऊन काय करणार असं त्यांच म्हणणं होतं पण मी हट्टाला पेटलो होतो, शेवट नाईलाज झाल्यानं सरांनी मलाही स्पर्धेेत भाग घ्यायची परवानगी दिली. स्पर्धा शालिमारला कोणत्याश्या इमारतीमध्ये किंवा शाळेत होती. विषय आला होता पावसाळी ऋुतूत मुलं खेळताना… माझा मुड छान होता, मी छानंस चित्र काढलं आणि रंगवलंही, माझं चित्र लवकर करून झालं त्यामुळे मी लवकर बाहेर आलो, सुर्यवंशी सरांनी मला बघताच जवळ येऊन म्हटले की  काय रे, काय चित्र काढलंस, आणि इतक्या लवकर कसा काय बाहेर आलास?  मी सांगितलं जे चित्र काढलं ते आणि सरांनी माझ्याकडं अशा तर्‍हेने नजर टाकली की त्यांची नाराजी अजून गेली नाही हे माझ्या लक्षात आलं, मी जरास्या बेफिकीरीनं ती गोष्ट नजरेआड केली (अर्थात त्याशिवाय माझ्याकडं दुसरा काही पर्यायही नव्हता म्हणां) शाळेत परत येत असताना सर्व मुलांसमोर सर मला परत म्हटले एकाच घरातून दोन जणांनी भाग घेतला तरी बक्षिस तर मंजुषालाच (माझी बहिण)मिळणार आहे तु जर भाग घेतला नसता तर तुझ्या ऐवजी आणखीन एका दुसर्‍या मुलाला स्पर्धेेत भाग घेता आला असता तर शाळेला आणाखीन् एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता तरी होती, तु तर निम्म्या वेळातच बाहेर आलास काय उपयोग झाला तुझा हट्ट करून, मी काही बोलू शकत नव्हतो कारण त्याकाळात सरांचा वडीलांएवढाच धाक वाटायचा.  15 दिवसांनी स्पर्धेेचा निकाल लागला आणि सुर्यवंशी सर माझ्या वर्गात आले व मला त्यांनी सांगितले की मंजूचा पहिला आणि तुझा चक्क दुसरा नंबर आला आहे त्यांच्या डोळ्यात काहिसे आश्‍चर्याचे भाव होते ते पुढे म्हणाले अरे वेड्या ही जिल्हास्तरीय स्पर्धा होती व मला अजिबातच वाटत नव्हत की आपल्या शाळेला दोन -दोन बक्षिसं मिळतील, मी नेहमीच्या बेफीकीरीने सरांकडे पाहिले आणि परत माझ्या कामाला लागलो. कॉलनीमध्येही प्रत्येकजण एकमेकांना नुसतंच ओळखत नसतं तर वेळ पडली तर मुलांना वडीलकीच्या नात्यानं दटावतही असतं आणि मुलंही घरातून दटावणी मिळाल्यागत मर्यादेत हुंदडत असतं. एकोपा काय असतो हे इथंच कळलं. अगदी एकत्र कुटुंब पद्धत असल्याप्रमाणे राहणारी सर्व आर्थिक स्तरातील वेगवेगळी कुटुंब म्हणजे आमची मेरी कॉलनी. कोणताही सण असो किंवा कार्यक्रम असो कॉलनीमध्ये एकत्र साजरा करण्याची पद्धत होती. कॉलनीचा स्वतःचा क्लब हाऊस (1982सालापासून) होता तिथं सर्व प्रकारच्या खेळांसाठी साहित्य आणि सोयी होत्या त्या सर्वजण सारख्याच अधिकारानं वापरु शकत होते. गणपती उत्सवाच्या वेळी तर 10 दिवस नुसती धमाल असायची. रोज वेगवेगळे कार्यक्रम असतं. स्पर्धा भरवल्या जातं सर्व कॉलनीतील लोक त्यात भाग घेत असतं. आम्हा मुलांसाठी दोन तीन विशेष कार्यक्रमांचं आकर्षण असे ते म्हणजे आनंदमेळा, पिक्चर (त्याकाळी प्रोजेक्टर आणून कॉलनीत एखादा पिक्चर दाखविला जात असे) आणि ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्राच्या व नाटकाच्या तालीमी क्लब हाऊसमध्ये महिना-महिना चालत असतं. माझी सर्वात मोठी बहिण मनिषा हिनं नाटकात भाग घेतलेला तर दुसर्‍या बहिणीनं तिच्या एका मैत्रिणीबरोबर ऑर्केस्ट्रात गाण्यात भाग घेतलेला होता. (दोघींनीही हौसी कलाकार म्हणून ती कामं केली होती मेरीनंतर त्या विषयात पुढे आम्ही तिघांनीही कधीही गाणं-नाटक ह्यात काहीही केलं नाही) 1985 च्या दशकात ऑर्केस्ट्राचं सर्वांनाच फार अप्रुप असायचं, त्यांचा तो लवाजमा, गायकांचा आणि वादकांचा फौजफाटा, चित्ताकर्षक दिव्यांची संगती, वादकांचे कपडे आणि त्यांचे वाद्य. इत्यादी असो,दोघींच्या तालीमीच्या निमित्ताने मी ही त्यांच्या बरोबर जायचो पण नाटकाच्या तालमीत मला फारच कंटाळा यायचा,  फारच रटाळवाणी तालीम वाटायची मला ती. त्यामानानं ऑर्केस्ट्रा सर्वच बाबतीत भुरळ घालणारा होता माझं सारं लक्ष तिथं असायचं आणि मी तिथे सारखा जाऊन बसायचो. तिथल्या वाद्यांनी माझ्या मनात कुतूहल निर्माण केलं होतं,लक्षपूर्वक सर्व बघायचो आणि वेळ कसा जायचा हे कळायचंच नाही. एके दिवशी जरा लवकरच क्लब हाऊसवर पोहोचलो, ही कलाकार मंडळी सरावासाठी काही किमान वाद्य घेऊनच सराव करीत असत. अजून सर्व जमायचे होते पण वादकांची आणि वाद्यांची पूर्वतयारी झालेली होती आणि सरावासाठी गायकांची वाट पाहणे चालू होते त्यामुळे वादकही क्लब हाऊसमध्ये इतरत्र रेंगाळत गप्पा मारीत होते. मी सरावाच्या ठिकाणी गेलो तर तिथे कोणीच उपस्थित नव्हते आणि वाद्य मांडून ठेवलेली होती. मी आजपर्यंत लांबूनच बघितलेल्या वाद्यांनी माझं कुतूहल चाळवलं होतं, ती मला खुणावत होती मी हळूच एकेक वाद्यापाशी जाऊन ती न्याहळू लागलो त्यांना हळूच स्पर्श करून पाहू लागलो इतक्यात गाण्याचा सराव करून घेणारी व्यक्ती (अ‍ॅरेंजर) श्री पाटेकर तिथे आले. त्यांनी सरावाच्या हॉलमध्ये डोकावून पाहिले आणि कोणीच नाही आणि एक 13-14 वर्षांचा मुलगा एकटाच आत पाहून आत आले आणि मला विचारले काय रे, काय करतोस? मी चाचरतच सांगितले काही नाही बघत होतो; त्यांनी विचारले वाजवता येतं का तुला ? मी  उत्तरलो नाही. मग वाद्यांना हात लावू नकोस असं बजावून त्यांनी सगळ्यांना सरावासाठी हाक मारली आणि नेहमीप्रमाणे सराव चालू झाला. मी मात्र त्यादिवशी विशेष खुशीत होतो की इतकी जवळून वाद्ये बघायला मिळाली. त्यानंतर रोजच मी तिथं सरावाच्या वेळी हजर असायचो, पाटेकरांनाही आता मी ओळखीचा झालो होतो आणि मी गाणं गाणार्‍या एका मुलीचा भाऊ असल्याच त्यांच्या लक्षात आलं होतं. माझं रोज तिथं येणंही त्यांनी त्यांच्या मनात नोंदवलं असावं त्यामुळं माझा तिथला वावर सहज होऊ लागला. तिथले सगळेच जण मला ओळखू लागले होते. एके दिवशी असंच मी सरावाच्या ठिकाणी गेलो असताना सराव चालू होण्याच्या अगोदर पाटेकरांनी मला विचारले तुला इतके आवडते तर एखादं वाद्य शिकत का नाहीस?  मी म्हटलं त्यात काय शिकायच मी वाजवू शकतो. त्यांनी विचारले काय वाजवू शकतोस तु ? मी एका तालवाद्याकडं (कोंगोकडे बोट दाखवून कारण त्याला काय म्हणतात हे मला माहित नव्हतं) सांगितलं की हे वाद्य वाजवू शकतो मी. त्यांना आश्‍चर्य वाटलं आणि त्यांनी एकाला टेपरेकॉर्डर वर सरावाच एक गाणं लावायला सांगितलं, गाणं सुरू झालं इतर वादकांनी वाजवायला सुरवात केली आणि मला म्हणाले चल, ये इकडे आणि वाजव बर ! मी अगदी बेधडक गेलो आणि वाजवायला सुरवात केली. रोज जाऊन आणि निरीक्षणानं जेवढं समजत होतं तेवढं वाजवलं साधारण एक कडवं संपल्यावर त्यांनी सगळ्यांना बंद करण्याची खुण केली आणि सर्व शांत झालं. मी बहिणीकडे नजर टाकली ती थोडीसी भेदरलेली वाटली. पाटेकर माझ्याकडं वळून म्हटले त्यादिवशी तुला विचारलं तर तु म्हणालास तुला येत नाही पण तु तर बरा वाजवितोस की, तालाची समज दिसते तुला. हां, वादनाचे बारकावे नाही येत तुला पण लवकरच शिकू शकतोस तु वाजवायला; वाजवत जा ! त्यादिवशी तर मला आकाश ठेंगणं झाल्यासारखंच वाटत होत कारण मला वाजवायला मिळालं होतं. त्यानंतर मी सरावाच्या आधी वादकांकडून त्याबद्दल काही आणखीन गोष्टी माहित करून घेतल्या. गाण्यात वाद्याचं महत्त्व आणि त्याच नेमकं वादन यावर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. नंतर माझ्या आग्रहावरून त्यांनी मुख्य कार्यक्रमात माझ्या बहिणाीच्या गाण्याच्या वेळी मला कोंगो वाजविण्यास परवानगी दिली कारण त्यांच्या ऑर्केस्ट्राच्या व्यावसायिक गायकांबरोबर ते मला वाजवू देण्यास तयार नव्हते आणि ते साहजिकही होतं (ऑर्केस्ट्रा कॉलनीतील लोकांनी ठेवला असल्यानं संपूर्ण कार्यक्रमात कॉलनीतील काही हौसी मंडळी गायची आणि त्यांचा सराव घेण्यासाठीच रोज ही ऑर्केस्ट्राची मंडळी क्लबहाऊसला येत असतं) त्यानंतर तीन वर्ष मी ऑर्केस्ट्राचे आकर्षक भपकेबाज कपडे घालून कॉलनीतील कार्यक्रमात कोंगो किंवा एखादं तालवाद्य वाजवायचो. कालांतराने साधारणतः 1989 सुमारास मेरी सोडून आम्ही त्रिंबकरोडला विकास कॉलनीत आमच्या स्वतःच्या बंगल्यात स्थलांतरीत झालो आणि हे सर्व बंद झालं. त्यानंतर बरीच वर्षे आयुष्याला आकार देण्यात गेली त्यामुळे कोणत्याही छंदाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही किंबहूदा प्राधान्यक्रमात त्याचा क्रम फारच खाली ठेवला गेला. 2000 साली एकदा असंच अचानक एका मित्रामुळ मी फोटोग्राफीबद्दल माझं कुतूहल वाढलं. त्याआधी त्याचा मी कधी फारसा विचार केला नव्हता, नाही म्हणायला मेरीमध्ये असताना आमच्याकडे एक हॉटशॉट कॅमेरा होता आणि त्याच्यातून बरेच फोटो मी काढले होते. आम्हा भाऊ-बहिणींचे, कॉलनीतील मित्रांच्या ग्रुपचे, शेजार्‍यांचे आणि आमच्या स्वीटी नामक पामेरीयन कुत्रीचे असंख्य फोटो काढले त्यातील काही आजही माझ्या संग्रही आहेत. पण त्याव्यतिरीक्त छायाचित्रण ही कला आहे किंवा छंद असू शकतो ह्यावर मी कधी विचारही केला नव्हता. मघा उल्लेख केलेला मित्र म्हणजे खरं तर त्यावेळी सेवानिवृत्त असलेले वयाच्या पासष्टीमध्ये असणारे माझे एक ग्राहक श्री भा.ग. शेरे ! मी 1996-97 ला प्रिंटींगचा व्यवसाय सुरू केला आणि साधारण 2000 साली प्रकाशनात उडी घेतली. भा.ग.शेरे हे तसं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, उत्साहाचा अखंड वाहता झराच जणू ! संगीतक्षेत्रात अत्यंत मोठ-मोठ्या गायक आणि वादकांच्या त्यांचा अगदी घरोबा आणि जिव्हाळ्याचे संबंध. कायम स्कुटरवरून भारतात कुठेही भटकंती, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकसंग्रह असे हे शेरे काका एक दिवशी माझ्याकडे अत्याधुनिक असा कॅनॉन चा कॅमेरा घेऊन आले. त्यांना तो कॅमेरा त्यांच्या दुबईत वास्तव्यास असलेल्या मुलानं पाठविलेला एक डीएसएलआर कॅमेरा होता. त्यावरून त्यांनी असंख्य फोटो काढले होते. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण फुलांच्या फोटोंचं एक सुंदर अस डेस्क कॅलेडर करण्याची कल्पना घेऊन ते माझ्याकडे आले होते. फोटो बघून मी हरखून गेलो आम्ही डेस्क कॅलेंडर तर केलंच आणि ते हातोहात खपलं ही! अगदी महेंद्र अ‍ॅण्ड महेंद्र कंपनीच्या विशिष्ट ऑफीसर्स साठी आम्ही त्याची ऑर्डर मिळवली. त्या कॅलेंडरच्या निमित्ताने कॅमेरा माझ्या आयुष्यात परत एकदा प्रवेश करता झाला. आधीची चित्रकलेची पार्श्‍वभूमी आणि आता प्रिटींगचा व्यवसाय असल्याने कलाकार मंडळीबरोबर माझ चांगलच सख्य राहीलं. त्यामध्ये नाशिकमधील काही जाणते फोटोग्राफर्स ही होते, ज्यांच्याशी गप्पा होत असतच. आणि मग मलाही कॅमेरानं खुणावलं आणि मी शेरे काकांना गळ घातली की मलाही तुमच्यासारखा अद्ययावत कॅमेरा तुमच्या मुलाकडून मागवून द्या. त्यावेळी त्यांच्याकडे असलेला कॅमेरा हा नाशिकमध्ये अगदी व्यावसायिक म्हणवणार्‍या फोटोग्राफर्समध्येही बोटावर मोजण्याइतक्यांकडेच होता. त्यामुळे त्याप्रकारच्या कॅमेराचं विशेष आकर्षण होत. पण त्याची किंमतही तशीच होती. मी ही इरेला पेटलो होतो काहीही विचार न करता मी त्यावेळी 65000 रुपयांचा तो कॅमेरा 28-200 लेन्स सह शेरेकाकांना मागवायला सांगितला. पण त्यांचा मुलगा नुकताच भारतात येऊन गेला असल्यामुळे तो आता वर्षभर तरी परत भारतात येणार नव्हता. मग काय मी शेरे काकांचा कॅमेरा वापरून माझी जिज्ञासा आणि शिक्षण पूर्ण करीत राहीलो. त्यांच्या मुलाचा दुबईतील प्रोजेक्ट लांबल्यामुळे तो साधारणतः दिड ते दोन वर्षांनी भारतात दाखल झाला तो माझा कॅमेरा घेऊन! आणि ऑगस्ट 2002 रोजी माझ्याकडे माझा स्वतःचा अद्ययावत असा कॅमेरा आला. स्वतःचा कॅमेरा असल्याने आता मला मनाप्रमाणे तो वापरता येणार होता. शेरे काकांचा कॅमेरा मी फक्त ऑटो मोड वर वापरायचो कारण एक तर तो माझा नव्हता आणि बर्‍यापैकी महागही होता त्यामुळे काही झालं तर मला ते परवडणारं नव्हतं अगदी दोन्ही दृष्टींनी – आर्थिकदृष्ट्याही आणि काकांसाख्या मित्राची नाराजी हे दोन्ही मला परवडणारं नव्हतं त्यामुळे माझा कॅमेरा येताच मी त्यावर शिकण्यावर भर देऊ लागलो. माझा दुसरा एक मित्र नितीन बिल्दीकर हा जुन्या जाणत्या श्री गोपाळ काळे ह्यांच्याकडे फोटोग्राफी शिकलेला असल्यानं आणि माझं त्याच्याकडे पस्तकांच्या कव्हर आणि इतर आर्टवर्कमुळे नेहमी जाण येणं असल्यानं घनिष्ट संबंध होते. तो फाईनआर्ट झालेला आहे.  त्याने मला कॅमेराचं मुळ शिक्षण दिलं. गोल्डन पॉईंट, कम्पोझिशन ऑफ सब्जेक्ट, लाईटचं महत्त्व, अ‍ॅपार्चर, शटरस्पीड च्या गमती आणि त्यांचं महत्त्व, फोटोग्राफीतील वेगवेगळ्या शाखा इत्यादीं वर आमच्या गप्पा होत असतं. इथ एक नमुद करायलाच पाहिजे की नितीन हा एक चांगला शिक्षक आहे. एखादी गोष्ट समजावून सांगण्याची त्याची पद्धत विषय सरळ तुमच्या मेंदूतच पोहचवते असा माझा अनुभव आहे. माझा कॅमेरा आल्यानंतर माझा एक दुसरा मित्र आणि मी दर शनिवारी नाशिकजवळील एखाद्या ठिकाणी जात असू आणि छायाचित्रणाचा एक प्रकारे अभ्यासच करीत असत. त्यानंतर त्या फोटोंच्या कॉपीवरून काय बरोबर आणि काय चुकले ह्याबद्यल नितीनकडून मी जाणून घ्यायचो. अशा रितीने माझा फोटोग्राफीचा छंद आकार घेऊ लागला. मग मी गांभीर्याने विचार करू लागलो की माझ्या व्यवसायात फोटोग्राफी ही तशी पाहता आवश्यकच आहे तर फोटोग्राफीचे शिक्षणच का घेऊ नये ? त्यादृष्टीने माझी नितीनशी चर्चा झाली आणि मी ठरविले की शास्त्रोक्त शिक्षण घ्यायचे आणि मग फोटोग्राफी शिकविणार्‍या संस्थांचा शोध सुरू झाला. माझा नेहमीच एक आग्रह किंवा प्रयत्न असतो की जे करायचे ते आपले 100 टक्के देउन आणि उत्तमच! त्यामुळे जुजबी शिकविणार्‍या संस्था माझ्या पसंतीस उतरत नव्हत्या. आणि असंच मला एकदा शारी अ‍ॅकॅडेमी, मुंबई बद्यल माहिती मिळाली आणि मी त्याबद्यल अधिक माहिती त्यांच्या वेबसाईटवरून मिळविली आणि संस्थेला भेट देण्याचे ठरविले. योगायोगाने तो जून- जूलै चा काळ असल्याने त्यांचे अ‍ॅडमिशनच्या आधी काही सेमीनार्स आयोजित केलेले होते ज्यात फोटोग्राफीची प्राथमिक अवस्थेच्या थोडी पुढील माहिती जसे लाईट्सचा कलात्मक वापर, लाईट मोजणे आणि फोटोग्राफीच्या इतर शाखांची प्रात्यक्षिकासह तोंडओळख अशा स्वरूपाचे ते 5 दिवसीय शिबीर होते. मी ठरवून टाकले की हे सेमीनार करायचेच. त्यादृष्टीनं तयारीला लागलो आणि सर्वप्रथम मुंबईत पाच दिवस राहण्याचा प्रश्‍न निर्माण झाला तोही वडीलांनी एका चुलत काकाशी बोलून सोडवला. काका कल्याणला राहायचा आणि सेमिनार होते मुलंडला. त्यात मी मुंबईला त्याआधी 4-5 वेळेसच गेलेलो तेही एका ठराविक भागात त्यामुळे माझ्यासह सगळेच काळजीत होते फक्त मी तसे दाखवित नव्हतो आणि त्यातील दिव्यही मला माहित नव्हते. एकदाचा तो दिवस उजाडला आणि मी मुंबईत कल्याणला काकांकडे दाखल झालो, सुरवातीला घरची हाल-हवालीच्या गप्पा झाल्यावर मी काकांना विचारले की कल्याणहून मुलुंडला जायचे कसे ? काकांचे उत्तर …ट्रेन ने ! मी म्हटले ते ठिक आहे पण लोकल कुठल्या प्लॅटफॉर्मवरून पकडायची, कुठे उतरायचे आणि हा अमुक अमुक पत्ता आहे तिथे कसे पोहचायचे? आमचा काका मिश्किल हसत म्हणाला पत्ता विचारत पोहचायचे. नंतर मग त्याने सांगितले कसे जायचे; ते पण संपूर्ण आयुष्य नाशकात घालवलेल्या माझ्यासारख्या एका टोका पासून दुसर्‍या टोकाला जास्तीत जास्त अर्ध्या तासात पोहचायची सवय ते ही स्वतःच्या वाहनानं असलेल्या माणसाला दोन दिवसांतच कळले मुंबईच्या माणसांची जगण्याची कसरत !  पहिल्या दिवशी थोडा उशीरा म्हणजे 11 वाजता सुरू होणारं सेमिनार गाठायला सुद्धा पत्ता शोधायचा असल्याने साधारण अर्धा तास उशीरच झाला. मी पोहचलो तेव्हा सेमिनार सुरू झालं होतं. एका इंस्टड्रीयल वसाहतीवजा असलेल्या परिसरात औद्योगिक शेड भासावी एवढ्या मोठ्या इन्स्टीट्यूट मध्ये दाखल झालो. प्रवेशद्वारावरूनच मन दडपले, आत दाखल झालो उजव्या बाजूलाच एक मोठं टेबल होतं त्यामागे एक तरुणी बसलेली होती, डाव्या हाताला नजर टाकली तर मॅझॅनीन फ्लोअरवर (पोटमाळा)जायला चांगलाच एैसपैस म्हणजे 4 फुटापेक्षा जास्त रुंदी असलेला लोखंडी जिना होता वर बघितलं तर वर लायब्ररी असल्याचा अंदाज येत होता. समोरच्या बाजूला बरेचसे फोटोग्राफ्स वेगवेगळ्या पार्टीशन्सवर लावलेले दिसत होते. त्यांच्या जवळ जाऊन मी ते बघण्यास सुरवात केली. डेस्कमागची तरुणी माझ्याकडे विचित्र नजरेने बघत आहे हे माझ्या लक्षात आल्यावर मी तिला सेमिनार बद्दल विचारलं, तिने समोरच्या बंद दाराकडे बोट दाखवून सांगितले की, चालु होऊन अर्धा-पाऊण तास झाला आहे. तिला विचारून मी हळूच दरवाजा उघडला, सर्वांच्या नजरा माझ्याकडे होत्या, सेमिनार घेणार्‍या व्यक्तिने मला माझे नाव विचारले काय काम आहे विचारले आणि सेमिनारला आलो आहे ही खात्री झाल्यावर बसायला सांगितले. मी एका खुर्चीवर उशीर झाल्यामुळे आधी किती वेळाचे आणि किती महत्त्वाचे गेले असावे याचा विचार करत बसलो. काही वेळाने मात्र विषयात लक्ष केंद्रीत करून ऐकू लागलो आणि माझ्यासमोर ज्ञानाचे एक एक पट उलगडू लागले. जस जसे सेमिनार पुढे जात होते तस तसे मला जाणवू लागले की, मुंबई नाशिकच्या किती आणि का पुढे आहे. इथल्या माणसांची पद्धत सडेतोड, कामाच्या वेळेस काम आणि फक्त कामच, तेही गांभिर्याने तर मजा करायच्या वेळेस पूर्णपणे मजा अशी वृत्ती; ह्या सर्व गोष्टींची मनात नोंद होत होती. त्यांची व्यावसायिक निष्ठा मनावर बिंबवत होतो. एका संपूर्ण वेगळ्या अनुभवाचा धनी होऊन माझा तो दिवस मावळला. संध्याकाळी सहा वाजता सेमिनारचा पहिला दिवस संपला. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजताच सेमिनार सुरू होणार असल्याची सुचना झाली आणि नंतर मी चालत रेल्वेस्टेशन पर्यंत आलो. साधारण अर्धा तास लागला. त्यानंतर लोकल मिळून कल्याणला काकांच्या घरी पोहचायला 7.30 ते 8 वाजले होते. त्यामूळे गेल्या गेल्या हातपाय धुवून काकूंनी जेवायलाच बसायला सांगितले. त्यानंतर गप्पा मारत असताना मी सहजपणे काकांना सांगितले की उद्यापासून सकाळी नऊ वाजताच सेमिनार आहे. काकांनी चमकून काकूंकडे पाहिले आणि त्यांनी मनाशी वेळेचं काही गणितं करून मला किती वाजता घरातून निघावं लागेल ह्याबद्दल चर्चा केली आणि काकूंना काही सूचना केल्या. ती चर्चा ऐकून मी चपापलोच कारण मला सेमिनारला पोहचण्यासाठी माझ्यासह त्यांनाही बरीच कसरत करावी लागणार होती. मी काकूंना नाष्टा करू नका म्हणून सांगितलं अर्थातच त्यांनी ते मान्य केलं नाही. पुढील चार दिवस मी सकाळी सव्वासातची लोकल पकडायचो आणि धावत-पळत सेमिनारला पोहचायचो. हि सर्व अंगवळणी नसलेली धावपळ करूनही मी खुश होतो कारण पदरी खुपच महत्त्वाची व्यावसायिक माहिती पडत होती. तिसर्‍या दिवसापासून स्वतः गिरीश मिस्त्रि सर (इन्स्टिट्यूटचे डीन) अर्ध्या दिवसासाठी इन्स्टिट्यूटमध्ये हजर असतं. मी प्रथम जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा हादरूनच गेलो कारण मी अजिबातच कल्पना केली नव्हती की, एका व्हिलचेअरवर बसून ह्या माणसानं फोटोग्राफीमध्ये इतकं ज्ञान व नावही कमावलं आहे ते. त्यांचा इंन्स्टिट्यूटमधला वावर सर्वांना भारावून टाकायचा. आमच्या ग्रुपमध्ये काही मुंबईचे तर काही गुजरातचे फोटोग्राफीचा पूर्णवेळ व्यवसाय करणारे मेंबर्स होते. मीच एकटा हौसी कलाकार असल्यानं मला बुजल्यासारखं होत असे पण त्यांनी विचारलेल्या शंकांवरून माझ्या असं लक्षात आलं की, ही सर्व मंडळी जरी व्यवसाय करत आहेत आणि त्यात आर्थिकदृष्ट्या यशस्वीही आहेत तरी त्यांचा हा व्यवसाय फारच तुटपूंज्या माहितीच्या बळावर चालू आहे. मला मोठी गम्मत वाटली की, पैसे कमविण्यासाठी सखोल ज्ञान असलच पाहिजे असे नव्हे तर अजूनही बर्‍याच गोष्टींमुळे तुम्ही व्यवसायात आर्थिक यश गाठू शकता. ह्या सेमिनारनं मला बरंच शिकवलं, फोटोग्राफीबद्दल तसंच जीवनाबद्दलही  !  सेमिनारच्या शेवटच्या दिवशी तिथे प्रदर्शीत केलेले फोटो बघत असताना असं लक्षात आलं की, मी जे फोटो बघून ते कोण्या मोठ्या फोटोग्राफर्स ने व्यावसायिक कामासाठी काढले असावेत आणि इथे ते अभ्यासासाठी लावले असावेत असं समजत होतो ते तसं काही नसून इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनीच पहिल्या किंवा दुसर्‍या वर्षाच्या अभ्यासक्रमात केलेल्या कामाच ते सबमिशन होतं. परत एकदा मी ते काम बघून आवाक झालो आणि हि इन्स्टिट्यूट म्हणजे मला जादूची कांडी असल्यासारखं वाटलं. मला प्रकर्षानं जाणवू लागलं की, इथे पूर्ण वेळ अभ्यास केला पाहिजे. मी चौकशी केली असता समजलं की इथे 3 ते 5 वर्षांच्या कालावधीचे वेगवेगळे कोर्स आहेत. त्यांची फी वर्षाला कमीत कमी सव्वालाख होती त्याशिवाय राहणं-खाण्याचा खर्च वेगळा आणि अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांसाठी लागणारे पैसे आणखीन् वेगळे. आणि तो अ‍ॅडमिशनचाच कालावधी असल्याने पाच दिवसांत मी देशभरातल्या अनेक पालकांना तिथं आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून धडपडताना पाहत होतो. जे फोटो लावले होते त्यात ही अगदी आसाम पासून केरळ, दिल्ली पासून सर्व भागातले विद्यार्थी आहेत हे लक्षात येत होतं आणि ती आम्हाला तिथं भेटतही होती. मला एवढ्या कालावधीचे कोर्स करणं कोणत्याच बाबतीत शक्य नव्हते कारण एक तर माझा व्यवसाय चालू होता, लग्न झालेलं होतं आणि अभ्यासक्रम कमीत कमी 3 वर्षांचा होता. पण तिथं मिळणार्‍या ज्ञानानं माझ्यावर गारूड केलं होतं त्यामुळे मी चिकाटीने डेस्कमागच्या तरुणीला विचारलं की काही शॉर्ट कोर्स नाहीत का ? तिनं नकारार्थी मान हलवली. तरी मी परत विचारल्यावर ती म्हणाली की आता तुम्ही अटेंड केला तसे सेमिनार्स होत असतात तेही साधारण अ‍ॅडमिशनच्या आधी ते अशाच साठी की पाल्य आणि पालकांना कळावं की इथं काय आणि कोणत्या पद्धतीनं शिकवलं जात, तुम्ही फार तर ते सेमिनास परत अटेंड करू शकता पण ते आता परत 6-8 महिन्यांनीच होईल किंवा सरळ पुढच्या अ‍ॅडमिशन्सच्या आधी. तिच्या कडे अधिक काही माहिती मिळणार नाही असं बघून मी बाजूला होत असतानाच माझं लक्ष गेलं की, समोरच्या केबिनमध्ये मिस्त्रि सर बसले आहेत आणि काही सेमिनार्सचे मेंबर्स त्यांना स्वतः काढलेले फोटो दाखवून त्यांचं, त्यावर मार्गदर्शन घेण्याच्या चढाओढीत आहेत. मी क्षणभर नाराज झालो की, अरे! आपणही एवढे फोटो काढले आहेत तर काही दाखवायला घेऊन यायला हवे होते, पण लगेच दुसरा विचार करून त्या गर्दीत सामिल झालो की, आपले नसले तर नसले फोटो, ह्या लोकांचे फोटो बघून सर काय सांगतात ते तर समजून घेऊ. मी त्या गर्दीत शिरून श्रवणभक्तीनं ज्ञान ग्रहण करू लागलो. तिथंही मला बरंच ज्ञान मिळालं. गर्दी कमी झाल्यावर मी सरांना भेटलो आणि माझी अडचण सांगून त्यांना एखादा शॉर्ट कोर्स आहे का हे विचारलं सरांनी मला एकवार न्याहाळलं आणि तसा काही कोर्स नाही म्हणून सांगितलं, मी चिवटपणे त्यांना विचारलं की सर तुम्ही मला तुमचा फोन नंबर आणि इमेल देता का, मी माझे काही फोटो तुम्हाला दाखवू इच्छितो, त्यांनी फक्त इमेल देण्याचं मान्य केलं पण मी लगेच मी सरांना म्हटलो सर मला तुमचा फोन नंबरही हवा आहे कारण माझ्यालायक काही कोर्स नसेल तरीही मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच शिकू इच्छितो आणि इमेलला तुम्ही प्रतिसाद दिला नाहीत तर ? हा प्रश्‍न विचारणं किंवा तशी शंका उपस्थित करण अगदीच असभ्यपणाचं होतं पण मला त्यांच्या मार्गदर्शनाची इतकी गरज वाटत होती की मी त्यात त्यांचा काही अपमान होत आहे हाही विचार केला नाही. इतर लोकांच्या नजरेत मला नाराजी जाणवली पण सरांनी मात्र विशेष वाईट वाटल्याच दाखविलं नाही आणि मला आश्‍वस्त केलं की, तुला मी प्रॉमिस करतो की तुझ्या मेलला मी आठ दिवसांच्या अवधीत उत्तर देईनच! तिथून मी तृप्त होऊन निघालो. सरांच वचन सरांनी आजपर्यंत मोडलं नाही. नंतर मी अनेक वेळा सरांना माझे फोटो पाठवून मार्गदर्शन घेतलं आणि त्याचबरोबर दरवेळी त्यांना माझ्यासाठी काहीतरी कोर्स डिझाईन करा असा लकडा लावत आलो. मधल्या काळात तीनचार वेळा मुंबईला जाऊन त्यांची भेट ही घेतली, शेवटी सेमिनार नंतर दोन वर्षांनी सरांनी मला एका भेटीत सांगितलं (कदाचित माझ्यापासून पिछा सोडविण्यसाठी असेल) की, तु असं कर मी तुला एक कोर्स शिकवतो तु आठवड्यातून एक वेळेस दोन दिवसांसाठी मुबंईत ये आणि मी सांगतो तसं कर पण तुला सर्टीफिकेट नाही मिळणार. आणि मी एका दिवसाचे 3000 रूपये फी घेईन. मी विचारलं पण असं किती दिवस ?  ते म्हणाले आपण काम चालु करू नंतरच माझ्याही लक्षात येईल की तुला कीती वेळ लागतो ते, मी तुला काही लेक्चर्सलाही बसू देण्याची व्यवस्था करीन, वर आपली लायब्ररी आहे तिथंही तुला जाता येईल. आणि तुला ताबडतोब एक डिझीटल कॅनॉन किंवा निकॉन चा कॅमेरा घ्यावा लागेल जो साधारण साठ हजारात मी इथूनच तुला मिळवून देईन. (माझा दुबईहून आणलेला कॅमेरा हा फिल्मबेस कॅमेरा होता त्यामुळे मला परत नवीन कॅमेरा घेणं क्रमप्राप्त होतं)  मी हिशोब केला मला हे सर्व प्रकरण साधारणतः 5000 रोज ह्याप्रमाणं पडणार होतं. माझी छाती दडपली. पण माझ्या प्रयत्नांना यश येत आहे असं दिसू लागलं होतं. नंतर एक विचार केला की करून तर बघू फार तर काय होईल पहिले पाच हजार जातील नाही परवडलं तर नंतर जायचं नाही. एकंदरीत विचार करून मी होकार दिला आणि माझं आगळं वेगळं शिक्षण सुरू झालं. अशा रीतीनं मी हा पंचेचाळीस दिवसांचा कोर्स साधारण दिड वर्षात पूर्ण केला. माझी दृष्टी पूर्णतः बदलली होती. सरांनी मला माझा कल व माझं टेम्प्रामेंट (स्वभाव) बघून इंडस्ट्रियल व प्रोडक्ट फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि तो मला अत्यंत मानवला कारण त्यानंतर थोड्याच कालावधीत मी नाशिकमधील अत्यंत प्रतिष्ठित अशा मोठ्या कंपन्यांसाठी, संस्थांसाठी आणि अनेक लघुउद्योगांसाठी कामे केली ती त्यांच्या पसंतीस उतरली आणि आजतागायत मी त्यांच्यासाठी आणि इतरही कंपन्यांसाठी काम करतो आहे व अर्थार्जन करीत आहे पण त्याही पेक्षा मला माझ्या आवडीचं काम करण्याचं एक फार मोठं समाधान त्यातून मिळतं. माझ्या प्रिटींगच्या व्यवसायत त्याचा मला फार उपयोग झाला आणि त्यामुळे माझ्या प्रिंटींगच्या कामांमध्येही खुप फायदा झाला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!